शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे लाभ लांबणीवर?
मुंबई : राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला वित्त विभागाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे शिक्षकांना लाभ मिळण्यास अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी फेब्रुवारीत राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यानुसार थकबाकी पाच हप्त्यांत देण्याचेही विभागाने जाहीर केले. वित्त विभागाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला वित्त विभागाकडून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. शालेय शिक्षण विभागाने फेब्रुवारीच्या नियमित वेतनाबरोबर थकबाकीचा पहिला हप्ता देण्याचे आदेश काढले. मात्र, या वेतनाबरोबर थकबाकीचा पहिला हप्ता देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे अनुदानच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थकबाकीचा पहिला हप्ता मिळण्यासाठी शिक्षकांना अधिक वाट पाहावी लागणार आहे.शिक्षक संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वित्त विभागाने लवकर अनुदान मंजूर करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली असून ३१ मार्चपूर्वी थकबाकीचा पहिला हप्ता देण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.